सिग्नल
गेली काही वर्ष ऑफिसला जायचा माझा रस्ता ठरलेला आहे - बालगंधर्वच्या पुलावरून डावीकडे वळून झाशीच्या राणीच्या चौकातून जंगली महाराज रोडला लागायचे आणि मॉडर्न महाविद्यालयाकडे मार्गस्थ व्हायचे। पुलावरून डावीकडे वळताना सिग्नल आहे. डावीकडे वळायला सिग्नल लागत नाही अशी आपल्याकडे प्राचीन समजूत आहे. काही वेळा ती बरोबर असते. परंतु या चौकातला सिग्नल थोडा वेगळा आहे. कॉर्पोरेशनकडून येणारी वाहने या सिग्नलवरून पुढे जातात आणि सरळ घोले रोडवर जातात अथवा जंगली महाराज रस्त्यावर डावीकडे वा उजवीकडे वळतात. जेव्हा त्यांना हिरवा सिग्नल असतो, तेव्हा पुलावरून डावीकडे येणा-या वाहनांनासुद्धा तांबडा सिग्नल असतो. जर तसे केले नाही तर पुलावरून येणा-या आणि कॉर्पोरेशनकडून येणा-या वाहनांची कोंडी होईल. परंतु एखादा नियम का बनविण्यात आला आहे याचा विचार न करता झुंडशाही करण्याची आपली सवय असल्याने या सिग्नल कडे काणाडोळा करण्यात येतो. मला जंगली महाराज रस्त्यावर उजवीकडे जायचे असल्याने मी सिग्नल तोडल्यास कॉर्पोरेशनकडून येणा-या वाहनांची फळी फोडून पलीकडे जावयास लागेल, ज्यामुळे मला आणि इतर वाहनांना त्रास होईल. अर्थात त्रास काय असतो याच्या लोकांच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. काही लोकांना मोठाच गोंधळ माजला की ’मजा’ वाटते. गणपती उत्सवात मोठमोठ्याने भेसूर ओरडत एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून साखळी करून गर्दीतून हुल्लड करत जाणा-या काही लोकांना इतर लोक घाबरले वा पळापळ/ चेंगराचेंगरी झाली की मजा वाटते! असो.या चौकात मी सिग्नल लाल असेल तर हटकून थांबतो. ज्यांना सिग्नलला थांबून उगाच वेळ ’वाया’ घालवायचा नसतो अशा काही अति-कर्म-तत्पर लोकांना मी वाटेत थांबल्याने त्रास होतो. दुचाकी वर असेन तर थोडा आणि कार मध्ये असेन तर थोडा अधिक. लोकांच्या प्रतिक्रिया ठराविक असतात - ’हे कोन येडं रस्त्यात थांबलंय’ अशा नजरेने पाहणे, हॉर्न वरचा हात न काढणे, शिव्या देणे, इ. लोक मी सोडून उरलेल्या जागेतून गाडी घुसवून पुढे जातात. मी स्थितप्रज्ञ भावाची आराधना करत ढिम्म उभा असतो.आज मात्र थोडी मजा झाली. मी सिग्नलला थांबता थांबता माझ्या बाजूला एक मुलगी कारमधून येऊन थांबली. ती तर चक्क वाहन थांबण्याचा इशारा वगैरे देऊन थांबली. दोन कार शेजारी थांबल्यामुळे तो रस्ता पूर्ण बंद झाला आणि मागच्या लोकांना हॉर्न आणि तळतळाट यांखेरीज इतर उपाय उरला नाही! न राहवून मी त्या मुलीकडे कटाक्ष टाकला ! तसं ’फ्रेंडली वेव्ह’ करायला हरकत नव्हती पण तसे केल्यास आम्ही ’पामर’ कसले :) पण बहुसंख्य लोक नियम तोडत असताना आपण नियम पाळणारे एकटेच वेडे नाही ही भावना मनाला सुखवून गेली.
http://paamar।blogspot.com/ या ब्लोग मधून
No comments:
Post a Comment