Friday, June 11, 2010

दमलेल्या बाबाची या कहाणी तुला

संगीतकार म्हणून सूर - तालाशी खेळताना , गायक म्हणून शब्द - सूर आळवताना रसिकांशी सुरेल नातं जुळत जातं । बघता बघता ते अबोल नातं बोलकं होतं आणि मग गप्पांची मैफल जमवायची इच्छा अनिवार होते ॥ दर १५ दिवसांनी ही सुरेल मैफल अनुभवता येईल . ‘ हॅलो सर , मी बर्लिनहून बोलतोय ! सर मी २८ वर्षांचा आहे आणि माझे आई - वडील ठाण्यात असतात . बाबा म्हणतायेत तू शिक अजून . ते कर्ज काढतायेत , पण मला वाटतंय आता बस्स ! मी पीएच . डी . झालोय ..’ नावसुद्धा न सांगता हा मुलगा ऊर फोडून बोलत होता . माझ्या तोंडून फक्त .. हं .. हं ..! ‘ मी परत ठाण्याला चाललोय , बाबांना सांगणार आहे , तुम्ही रिटायर व्हा ! माझे बाबा खरंच दमलेत हो .. गेले काही दिवस मी खूप दिवस अस्वस्थ होतो , पण काय करावं सुचत नव्हतं . इंटरनेटवर ‘ दमलेला बाबा ’ गाणं ऐकलं आणि परतीचं तिकीट काढलं .’ आता माझ्या तोंडून ‘ हं .. हं ’ सुद्धा जात नव्हतं , इतका सुन्न झालो मी . एक उच्चशिक्षित तरुण इतका हळवा होऊन छोटय़ा मुलासारखा रडत होता .. बाऽऽऽऽप रे ! हे काय आहे ? दाद ? चांगल्या गाण्याला प्रतिसाद़़ ? की रसिकता़़़ , हळवेपणा , खरेपणा .. खूप विचार केला आणि उत्तर सापडलं ते एवढंच , की ‘ याला म्हणतात नातं .
‘ दूर देशी गेला बाबा , गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यांत ॥ तरी घरी कुणी नाही ..’

हे आमचं गाणं ऐकून एक भगिनी रंगात येऊन रसग्रहण करीत होत्या - ‘ आजचे आई - बाबा स्वत : मध्येच इतके व्यस्त असतात की , मुलांसाठी वेळ आहे कोणाला ? आजची मुलं फार एकटी झाली आहेत । त्यांची व्यथा ॥ वगैरे वगैरे .. त्या कौतुक करत होत्या . पण ते ऐकताना डोक्यात इतका कल्लोळ झाला की , वाटलं , आम्ही नाही हो इतके वाईट , नाही हो इतके स्वार्थी .. हतबल आहोत आम्ही ! .. डोळ्यासमोरून एखादा चित्रपट जावा तसे मी पाहिलेले सगळे व्यग्र ‘ बाबा ’ सरकत होते .. खूप आधी ठरवूनसुद्धा आयत्या वेळेला बॉसनी महत्त्वाचं काम लावलं , म्हणून मुलाच्या गॅदरिंगला जाऊ न शकलेला ‘ बाबा ..’, त्याच गॅदरिंगमधलं मुलाचं गाणं फोनवरून ऐकून गाडीत एकटाच टाळ्या वाजविणारा ‘ बाबा ’, परदेशातून येताना मुलीने फर्माईश केलेली बार्बी डॉल घेऊन वाढदिवसाच्या दिवशी पोहोचण्याचा आटापिटा करताना विमान रद्द झाले , म्हणून रात्री उशिरा पोहोचल्यावर मुलीच्या उशाशी बाहुली ठेवून झोपलेल्या त्या मुलीकडे पाहत आपले अश्रू इतरांपासून लपवणारा ‘ बाबा ..’, नाटकाच्या दौऱ्यावर असताना दर चार तासांनी आपल्या बायकोला फोन करून सहा महिन्याच्या बाळाच्या कानाला फोन लावायला सांगून ‘ हॅलो हॅलो . मी बाऽबा ’ म्हणत आपला सहवास देऊ पाहणारा अस्वस्थ ‘ बाबा ’, घरापासून दूर सहा - सहा महिने बोटीवर , युद्धभूमीवर राहणारा आणि पत्रातून , फोनमधून ‘ माझी आठवण काढतात ना मुलं ? मी आठवतो ना त्यांना ? अशा प्रश्नांना बायकोच्या ‘ हो ..’ या उत्तरासाठी आसुसलेला ‘ बाबा ’.. इथपासून ते मुलीचं लग्न ठरल्यापासून रोज ‘ बोलता बोलता ठसका लागला म्हणून डोळ्यात पाणी आलं , बाकी काही नाही ..’ असं म्हणणारा ‘ बाबा ’! बाळाकडे पाहून वेडा होऊन नाचणारा ‘ बाबा ’, ऑफिसमध्ये अतिशय कडक असलेला , पण घरी शाळा - शाळा खेळताना मुलीच्या हातचा धपाटा आनंदाने खाणारा ‘ बाबा ’, रात्री उशिरा घरी आल्यावर मुलांच्या केसातून हात फिरवत एकटाच बोलणारा ‘ बाबा ’, मुलांबरोबर फटाके उडवताना पुन्हा एकदा लहान होणारा ‘ बाबा ’, कामानिमित्त घरापासून दूर राहूनही दर रविवारी काही तासांसाठी धडपडत घरी येऊन मुलांना डोळे भरून बघणारा बाबा , शिकायला परदेशात गेलेल्या मुलीशी वेब - कॅमवर गप्पा मारताना ‘ तू बारीक का वाटतेस गं ? तिकडे खूप त्रास होतोय का ?’ म्हणत ‘ नाही तर सरळ परत ये भारतात ’ असं सुचवणारा बाबा .. या सगळ्या बाबांची ‘ हाक ’, त्यांची धडपड , करिअर , पैसा हे सारे सांभाळत मुलांबरोबर वेळ घालविण्यासाठी ते करीत असलेला आटापिटा - हे सगळं सांगावसं वाटलं ! अशा प्रत्येक पुरुषाला ही बोच असते . जेव्हा मित्र एकत्र जमतात , तेव्हा एकमेकांना खूप मनापासून सांगतात की , ‘ थोडा आराम कर , मुलांबरोबर मजा कर ’ कळतं , पण साधायचं कधी ? कसं ? ते कळत नाही . या गर्दीत धावताना आपलं जगणं कुठे आपल्या हातात राह्यलंय ? माझा मुलगा मला जसं म्हणाला की , खूप गमती आहेत माझ्याकडे , आता नको पैसे , तू घरी थांब .’ .. कुठे थांबायचं हे मुलं सुचवतात , पण आपल्यालाच समजत नाही . धावत राहतो आपण . आणि मनात ही भीतीही बाळगतो की , उद्या मुलं मोठी झाल्यावर गरज असेल त्यांना आपली ? अस्वस्थ मनानं हे सगळं संदीप खरेशी बोललो . त्याचं आणि माझं नातं म्हणजे -
न सांगता तू मला उमगते सारे
कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघांत कशाला मग शब्दांचे बंध
कळ्यांचा चाले कळ्यांशी संवाद
असं आहे । त्यालाही हे सारे असंच , इतकंच तीव्रतेने वाटत होतं आणि त्याच्यातला हळव्या मनापासून कविता लिहिली . माझ्या अस्वस्थ अवस्थेतच चाल तयार झाली होती . दु : खापेक्षाही उद्विग्नता , फ्रस्ट्रेशन मांडणारी ही चाल आणि ते शब्द यांतून हे गाणं रसिकांच्या मनात खूप खोलवर रूजलं . प्रत्येक ठिकाणी वेगळे किस्से , वेगळ्या प्रतिक्रिया ॥ कार्यक्रमात छोटी - छोटी मुलं - मुली आपल्या बाबांना रडताना पाहून सुन्न झाली . कोणी ‘ माझ्या बाबाला का रडवलंस ’ म्हणून आमच्यावर चिडली . सासरी गेलेल्या मुलींनी ‘ बाबा गाणं ऐकलंत ?' म्हणत फोन केले . सगळ्यांच्या प्रतिक्रिया तुटक्या , हळव्या आणि दुखऱ्या .. हे गाणं मुलांनी बाबांसाठी ऐकलं आणि बाबांनी मुलांसाठी , आणि बाबांच्या बाबांसाठीही . हे गाणं जितकं बाबाचं , तितकंच ते आजच्या नोकरी - व्यवसाय करणाऱ्या आईचंसुद्धा .. प्रत्येक ठिकाणी गाण्यावर वेगळे किस्से , वेगळी प्रतिक्रिया .. सगळ्या तितक्याच हळव्या , दुखऱ्या .. ( इथे वाढू शकतं !!) आम्हीही घरापासून दूर - दूर पुन : पुन्हा हे गाणं गातो आणि जखम रोज भळभळते . रोज ठरवितो की , या महिन्यात थोडं नीट नियोजन करायचं . मुलांबरोबर करायच्या अनेक गोष्टी घोळतात , पण बघता बघता हा महिना सरकतो .. मग स्वत : लाच पुढच्या महिन्याचं वचन .. हे चुकतंय , ते समजतं , पटतं . जे ठरवतो , ते हातून घडत नाही , यासारखी दुसरी बोच नाही . थोडं थांबायला हवंय . वेग कमी करायला हवाय .. पण निदान हे जमेपर्यंत तरी स्वत : ला टोचून टोचून रोज गायलाच हवं

‘ असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो ?
लवकर जातो आणि उशिरानं येतो
सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बाबाची या कहाणी तुला
धन्यवाद रणधीर

1 comment:

Rahul Nikam said...

mastach!!
yacha youtube video pan chhan ahe...
Sandeep & Saleel sahich!!

Followers